Ad will apear here
Next
राफ्टींग इन ॠषिकेश
'आर यू रेडी फॉर द राफ्टींग?' गाईडने ओरडून विचारलं.
'येस्सऽऽ' त्यांनीही ओरडूनच उत्तर दिलं.
तो: चिडीमिडी, चिडीमिडी, धूमधडाका!
ते: हु-ह्हा! हु-ह्हा!
तो: चिडीमिडी, चिडीमिडी, धूमधडाका!
ते: हु-ह्हा! हु-ह्हा!
आपापल्या जागा पकडून आठही जण राफ्टमध्ये बसले आणि जलप्रवास सुरू होण्यापूर्वी गाईड अजून काही सूचना देतो का याची वाट पाहू लागले.
'आपमें से किस को तैरना नही आता?' गाईडने प्रश्न केला.
'आम्हाला पोहता येत नाही,' बाबाजी व उदयने कबुली दिली.
'तो फिर आप दोनों को कुछ नहीं होगा...' दोघांकडे बघत गाईड म्हणाला. 'बाकीच्यांची मला गॅरंटी देता येणार नाही कारण पोहता येतं म्हणून ते काहीतरी आगाऊपणा करणार.'
ऋषिकेशमध्ये रिव्हर राफ्टींगसाठी आलेल्या साह्यकडा एडवेंचर्सच्या टिमला गाईडने चेतावणी दिली आणि राफ्ट प्रवाहात शिरली. इथून पुढे ऋषिकेशपर्यंत १६ किलोमीटर जलप्रवासाला दोन ते अडीच तास लागणार होते.
गंगामैया म्हटलं की पाप-पुण्य, दान-धर्म, जन्म-मृत्यू-मोक्ष यांसारखे गंभीर विचार मनात येतात. ऋषिकेशपासून हरिद्वारकडे जाताना संथ वाहणारी गंगा हिमालयात उगम पावून ऋषिकेशपर्यंत येईतो एखाद्या अल्लड तरुणीसारखी हसत, खिदळत, नाचत येते. दोन्ही तटांवर असणाऱ्या डोंगरांमधून नागमोडी वळणं घेत आलेली गंगा व तिच्या भोवतीचे डोंगर बंगी जम्पिंग, जायन्ट स्विंग, फ्लाईंग फॉक्स, पॅराग्लायडिंग व रिव्हर राफ्टिंगसारख्या साहसी खेळांची पार्श्वभूमी बनतात.
दहा लोक बसू शकतील अशा हवा भरलेल्या रबरी बोटीमधून जलप्रवास करणं म्हणजे राफ्टींग. राफ्ट म्हणजेच रबरी बोट. काही राफ्टला मोटर असते तर काहींना पेडलिंग करावं लागतं.
राफ्टींग सुरू करण्यापूर्वी आपल्या कथेची कॅसेट थोडी मागे घेऊ.
स्टॉप. रिवाईंड. (सर्रऽऽ) स्टॉप. प्ले...
ऋषिकेशमध्ये त्रिवेणी घाट, बीटल्स आश्रम, राम झुला, लक्ष्मण झुला तसेच कुंजापुरी देवी मंदिर अशा स्थानांना भेट दिल्यावर साह्यकडाचे धाडसी प्रवासी राफ्टींगकडे वळले. इथे राफ्टींगचे चार पर्याय आहेत. कौंडिल्य ते ऋषिकेश ३६ किलोमीटर, मरीन बीच ते ऋषिकेश २६ किलोमीटर, शिवपूरी ते ऋषिकेश १६ किलोमीटर आणि ब्रह्मपुरी ते ऋषिकेश (निम बीच) ९ किलोमीटर. पैकी ६०० रुपये प्रतिव्यक्ती खर्च असलेली १६ किलोमीटरची राफ्ट राईड साह्यकडा एडवेंचरने स्वीकारली.
अर्धवट उघड्या टेम्पो ट्रॅक्सवर राफ्ट बांधून, मागच्या ओपन जागेत प्रवाशांना बसवून दोन टेम्पो ट्रॅक्स शिवपुरीच्या दिशेने निघाल्या. ऋषिकेशपासून १६ किलोमीटरवर शिवपुरीत पोचायला त्यांना अर्धा तास लागला. इथे राफ्ट खाली उतरवल्या, त्यात पुन्हा हवा भरली गेली आणि राफ्ट खांद्यावर घेऊन नदीपात्रात उतरवल्या गेल्या.
नदीच्या पात्राजवळ सर्वजण एकत्र आल्यावर गाईडने राफ्टींगविषयी सूचना दिल्या.
राफ्टमध्ये एका वेळी आठच जण बसू शकत होते. दोन जागा गाईड व त्याच्या सहाय्यकासाठी होत्या. एका राफ्टमध्ये सहा तर दुसरीत चार असंही करता आलं असतं पण ग्रुप विभागल्याने राफ्टींगमधली गंमत संपली असती.
गाईडने 'आपमे से सबसे तगडा कौन है?' विचारताच किरण व रजत पुढे झाले. त्यांना काय माहीत, राफ्टमध्ये पुढे बसवून गाईड त्यांना राफ्ट वल्हवण्याचा 'ओव्हरलोड' देणार होता!
उदयला पोहता येत नाही. त्याने युट्यूबवर राफ्टींगचे व्हिडिओ पाहिले होते. खळाळत्या पाण्यात हेलकावे खाणारी राफ्ट कधी कधी पाण्यात उलटते देखील. उदयने राफ्टींगचा धसका घेतला होता. शिवपुरीत आल्यावर नदीतल्या थंड पाण्याचा स्पर्श होताच त्याने राफ्टिंगला न जायचा निर्णय घेतला.
'काय झालं उदय, तू का येत नाहीस?' श्रीकांतने विचारलं.
'मला भीती वाटते. मी येत नाही,' अंग चोरत उदय म्हणाला, 'तुम्ही जा प्लीज.'
'काही होत नाही रे! तू बिनधास्त चल.' श्रीकांतने आग्रह केला.
'नको प्लीज. तुम्ही जा...' उदय मागे सरकला.
'राफ्टिंग करण्याची तुझी मनापासून इच्छा आहे ना?' पुढे येऊन उदयच्या खांद्यावर हात ठेवत श्रीकांतने विचारलं.
'इच्छा तर खूप आहे...' उदय हळू आवाजात बोलला.
'मग तू तुझ्या मनाचं ऐक आणि तयार होऊन राफ्टमधे बस!'
'टू डू ऑर नाॅट टू डू' अशा द्विधा मनोवस्थेत उदय तयार होऊन राफ्टमध्ये बसला.
पोहता न येणारा दुसरा माणूस होता, बाबाजी. आपले साथीदार आपल्याला बुडू देणार नाहीत याची खात्री असल्याने तो राफ्टमध्ये येऊन बसला. तसं पाहता बाबाजी आणि उदय दुसऱ्या राफ्टमध्ये जाऊ शकले असते पण 'अनोळखी लोकांबरोबर दुसऱ्या राफ्टमध्ये बसून पुढे आपण नदीत पडलो तर आपल्याला कोण वाचवणार?' म्हणून त्यांनी याच राफ्टमध्ये बसायचं ठरवलं.
तसंच आपल्याला दुसऱ्या राफ्टमध्ये पाठवतील की काय, या शंकेने निखिल आणि सचिन अगोदरच राफ्टमध्ये जाऊन बसले. शेवटी कुर्बानीची वेळ लीडर जोडीवर आली. कैलास आणि श्रीकांतने दुसऱ्या राफ्टची वाट धरली.
अरविंदचा 'ट्रेक अँड टूर्स' नावाचा युट्यूब चॅनेल आहे. साह्यकडा एडवेंचर्स तसेच काही वैयक्तिक ॲक्टिव्हिटीजवर आधारीत व्हिडिओ तो तिथे अपलोड करतो. केदारकंठ मोहिमेचे युट्यूब व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर तो ऋषिकेश राफ्टींगचे रफ फुटेज शूट करत होता.
'प्रत्येकाने आपापले मोबाईल, व्हिडिओ कॅमेरे व किंमती वस्तू आमच्या ताब्यात द्या. राफ्टिंग संपल्यावर आम्ही ते परत करू,' गाईडने असं सांगितल्यावर अरविंदची निराशा झाली. गाईड स्वतः शूट करणार असल्याने व्हिडिओ फुटेज मिळणार होतं तरीही 'आपल्याला हवं तसं शूटिंग दुसरा करणार नाही' याची रुखरूख अरविंदला लागली.
गाईडच्या सूचनांप्रमाणे साह्यकडा टिम पॅडल्स (वल्हे) मारत होती. हवेने टम्म भरलेली रबरी राफ्ट नदीच्या खळाळत्या प्रवाहाबरोबर सहज पुढे जात होती. काही ठिकाणी नदीपात्र अरुंद होतं तसंच नदी पूर्ण क्षमतेने वाहत नसल्याने दोन्ही किनारे कोरडे होते. साह्यकडा एडवेंचर्सच्या राफ्टच्या मागेपुढे इतरही राफ्ट होत्या. 'गंगा मैया की जय!' च्या घोषणांनी नदीपात्र घुमत होते.
'स्टॉप! स्टॉप!' गाईड ओरडला आणि पॅडल्स थांबली.
'लूक हिअर एव्हरीवन... आता आपला पहिला रॅपिड येणार आहे. त्याचं नाव आहे 'बॅक टू सेंटर.' आपली राफ्ट प्रवाहाच्या दाबाने नदीच्या किनाऱ्यावर उभ्या खडकावर जाईल. बॅकवर्ड पेडलिंग करून आपल्याला राफ्ट खडकावर आदळण्यापासून वाचवायची आहे.'
काही ठिकाणी अरुंद व उतार असलेल्या खडकाळ पात्रात नदीचा प्रवाह वेगवान होतो. त्यात लहानमोठ्या लाटा तयार होतात. असा 'रॅपिड' भाग पार करताना काळजी घ्यावी लागते.
पहिला रॅपिड नजरेच्या टप्प्यात येताच गाईडने सूचना दिल्या आणि टिमने जोरात पॅडल्स मारायला सुरुवात केली. वाहत्या पाण्याबरोबर राफ्टचा वेगही दुप्पट झाला. त्या रॅपिडवर नदी एकदम तीव्र वळण घेत असल्याने वेगात येणारी राफ्ट वळणावरच्या खडकावर आदळण्याची शक्यता वाढली.
'आज कुछ तुफानी करते है!' म्हणत टिम जोरात निघाली. राफ्टने वेग पकडला. दहा ते पंधरा फूट उंच खडकाळ भिंतीवर ती रबरी राफ्ट धडकायला जाणार तोच गाईड 'बॅकवर्ड पॅडलिंग' ओरडला आणि टिमने उलटी पॅडलिंग करत राफ्टचा वेग कमी झाला. अक्षरशः फूटभर अंतरावरून राफ्टने दिशा बदलली आणि खडकावर जाण्याऐवजी ती प्रवाहाबरोबर पुढे गेली.
'हिप हिप हुर्रे!' 'हिप हिप हुर्रे!' आठ जणांच्या टिमबरोबर यावेळी गाईड व त्याचा सहाय्यकही ओरडला.
रबरी राफ्ट एखाद्या खडकावर आदळली किंवा घासली तर फुटण्याची शक्यता असते. पण अशा प्रवासखेळात प्रवाशांच्या जीवाची सुरक्षा घेतलेली असते. ही रबरी राफ्ट चार भागांत विभागलेली असती. चारमधील एखाद-दुसरा भाग फुटला तरी चालतो. राफ्टचे तीन भाग फुटले तरी उरलेल्या एका भागावर प्रवासी ऋषिकेशपर्यंत जाऊ शकतात. दुर्दैवाने राफ्टचे चारही भाग फुटले तरीदेखील प्रवाशांनी घातलेलं लाईफ जॅकेट त्यांना बुडू देत नाही.
चांगले पट्टीचे पोहणारे म्हणून किरण व रजत सर्वात पुढे बसले होते. किरणच्या बाजूला सचिन, निखिल व धनाजी तर रजतच्या बाजूला अरविंद, उदय व बाबाजी होते. मोठ्या लाटा आल्यावर राफ्ट पुढच्या बाजूने उचलली जाते म्हणून बाबाजी व उदयने मागच्या जागा पकडल्या होत्या.
दुसरा रॅपिड 'थंडर-स्टाॅर्म' आल्यावर प्रवाहाचा खोडकरपणा समजला. दोन्ही बाजूंच्या खडकांमधून पाणी इतकं उसळत होतं की राफ्ट अचानक पुढच्या बाजूने उचलली गेली. एरवी नदीचं थंडगार पाणी अंगावर उडत होतंच पण यावेळी पाण्याने सर्वांना भिजवून टाकलं. वादळी समुद्रातील छोटी नौका लाटांवर स्वार होऊन नाचावी तशी ती राफ्ट गंगेच्या प्रवाहावर लचकत मुरडत पुढे जात होती.
'स्टाॅप! स्टाॅप!' गाईड ओरडला. 'इनसाईड द बोट...'
सर्वजण राफ्टच्या रबरी किनाऱ्यावरून उतरून खालच्या भागात बसले. आता राफ्ट जोरदार हेलकावे घेऊ लागली. नौकाविहाराच्या आनंदाने काहीजण उन्मत्त झाले तर उदयसारखे काही जीव मुठीत धरून बसले.
केदारकंठ मोहिमेत दहा जणांच्या साह्यकडा टिमचे नेतृत्व केलेले कैलास व श्रीकांत यावेळी बाजूला पडले. मुख्य राफ्टमध्ये जागा नसल्याने त्यांना दुसरी राफ्ट पकडावी लागली. त्या राफ्टमध्ये त्यांना कॉलेजवयीन गुजराती तरुणांची कंपनी मिळाली. या राफ्टींग एडवेंचरदरम्यान बुडण्याची भीती नसतानाही पोहता येत नसल्याने ते तरुण घाबरले होते.
'डरो मत! कुछ नही होता,' श्रीकांत त्यांना धीर देत होता.
एकीकडे साह्यकडाची मुख्य टिम जोशात पॅडलिंग करत असल्याने त्यांच्या राफ्टमागे आपली राफ्ट ठेवणं श्रीकांत, कैलासच्या टिमला अवघड जात होतं.
गंगेत चालणाऱ्या या जलक्रिडेदरम्यान प्रवाशांना पाण्यात उतरण्याची संधी दिली जाते हे यूट्युबच्या कृपेने सर्वांना माहीत होतं.
'आम्हाला न विचारता जर कुणी पाण्यात उडी टाकली तर तो बुडणार नाही पण हरिद्वार येईपर्यंत थांबणारही नाही...' ही सूचना गाईडने जलप्रवास सुरू करण्याअगोदरच दिलेली. गंगेचं पात्र कुठे खोल आहे - कुठे उथळ; कुठे संथ आहे - कुठे वेगवान, कुठे पोहण्यायोग्य आहे - कुठे वाहून जाण्यासारखं हे गाईडलाच माहीत. त्यामुळे पाण्यात उतरण्याची अतीव इच्छा असली तरी सर्वजण गाईडच्या सूचनेची वाट पाहत होते, फक्त उदय सोडून. बाबाजीलाही पाण्याची भीती होती पण लाईफ जॅकेटवर त्याचा विश्वास होता.
गाईडची सूचना होताच राफ्टला बाहेरून बांधलेल्या रस्सीला धरून एकेकजण पाण्यात उतरला.
ॲडवेंचरस स्पोर्ट्सची आवड असलेला रजत बाराही महिने फिरत असतो. पोहायची त्याला विशेष आवड. दिसली विहीर, टाक उडी! दिसली नदी, टाक उडी! दिसला धबधबा, टाक उडी! दिसली खाण, टाक उडी!
गंगेतल्या या जलप्रवासात पाणी राफ्टमध्ये शिरत होतं. गाईडच्या सूचनेनंतर सर्वजण रस्सीला धरून पाण्यात उतरले पण रजतने सवयीप्रमाणे राफ्टच्या कडेला उभं राहून नदीत उडी टाकली.
'अरे, पकडो उसको!' रजतवर चिडलेला गाईड ओरडला. वाहत्या नदीत उडी मारणारा माणूस कोणत्याही दिशेला ओढला जाऊ शकतो पण सुदैवाने मागे फिरून रजतने लगेचच राफ्ट पकडली.
राफ्टची रस्सी सोडायची नाही अशी कडक ताकीद गाईडने पुन्हा एकदा सर्वांना दिली.
'शूटिंग चल रही है ना?' पाण्यात उतरताच अरविंदने गाईडला विचारलं. त्याला राफ्टिंगचे सर्व क्षण कॅमेऱ्यात कैद करायचे होते.
'डोन्ट वरी! मैं सब शूट कर रहा हूँ,' हेल्मेटवरच्या कॅमेर्याकडे बोट करून गाईड हसला आणि रिलॅक्स झालेला अरविंद थंड प्रवाहात भिजण्याचा आनंद घेऊ लागला.
'सर, आप को पानी में उतरना नहीं है तो राफ्ट के अंदर बैठ जाईये...' इतर लोक पाण्यात उतरत असताना राफ्टमध्ये अंग चोरून बसलेल्या उदयला गाईडने सांगितलं आणि पडत्या फळाची आज्ञा मानून उदय राफ्टमध्ये मध्यभागी बसला. राफ्टला धरूनच पण एकमेकांपासून अंतर ठेवून पाण्यात उतरलेल्या दोन्ही बाजूंच्या प्रवाशांना गाईडने एकमेकांच्या जवळ यायला सांगितलं. राफ्ट मोकळी असली, तिला वल्हवलं जात नसलं, तरी प्रवाहाच्या वेगाने ती पुढे जात होतीच.
राफ्टने 'फुलचत्ती स्नान घाट' पार केला आणि गाईडने सर्वांना राफ्टमध्ये बसण्यास सांगितलं.
'कैसा लग रहा है?' सर्वांनी आपापल्या जागा पकडल्यावर गाईडने विचारलं.
'बहुत बढिया!' साह्यकडा टिम ओरडली.
मग सर्वांनाच जोश येऊन त्यांनी 'चिडीमिडी, चिडीमिडी, धूमधडाका!' 'हु-ह्हा! हु-ह्हा!' केलं आणि जोरात पॅडलिंग सुरू केली.
'रिलॅक्स गाईज... स्टॉप पॅडलिंग...' काही अंतर कापल्यावर गाईडने टिमला विश्रांती दिली व राफ्ट प्रवाहाबरोबर जाऊ लागली.
आता आपले जलप्रवासी आजूबाजूच्या निसर्ग सौंदर्याचं नयनसुख घेऊ शकत होते. गंगेचं ते थंडगार, थोडंसं हिरवट पांढरं पाणी, पात्रातले मोठ-मोठे दगड, किनाऱ्यावरची पांढरी माती, पांढरी वाळू, व पांढरे खडक, त्याच्यावर दिसणारे हिरवे डोंगर आणि त्याच्याही वर उंच निळंभोर आकाश. नदीच्या प्रवाहात त्यांच्या मागेपुढे भडक रंगाच्या इतरही राफ्ट होत्या. त्यापैकी काही राफ्टमधील प्रवासी आनंदाने चित्कारत होते पण पाण्यात उतरण्याचं धाडस करत नव्हते. पटना फाॅलजवळील गरुड चित्ती मंदिराजवळ टिम साह्यकडाचा साहस व निर्धार बघून गाईडने त्यांना पुन्हा एकदा पाण्यात उतरण्यास परवानगी दिली.
आता गाईडने एक लांबलचक रस्सी पाण्यात सोडली. मग एकामागे एक सर्वजण पाण्यात उतरले. राफ्ट पुढे जात होती आणि हे लोक तिच्यामागे ओढले जात होते. राफ्टने सापासारखी वळणे घेतली की मागचे प्रवासीही नागमोडी आकारात ओढले जात.
आता गाईडने त्यांना पाण्यात मनोरे बनवायला सांगितलं. अरविंद, किरण, रजतने राफ्टची रस्सी पकडली. तिघांच्या लाईफ जॅकेटला धरून मागे बाबाजी व निखिल तरंगले. त्या दोघांच्या मागे थांबून धनाजीने मनोरा पूर्ण केला. गाईडने राफ्ट वेगवान पाण्यात घातली आणि 'तीन-दोन-एक'चा जलमनोरा प्रवाहाबरोबर ओढला गेला.
'मुंह बंद रखो!' नदीचं पाणी पोटात जाऊ नये म्हणून गाईड वारंवार सूचना देत होता.
वाहत्या प्रवाहात राफ्टमधे बसणं तितकं सहज नसलं तरी त्याचंही तंत्र होतं. राफ्टला बाहेरून बांधलेल्या रस्सीला दोन्ही हातांनी धरून खाली दाबायचं आणि राफ्टमधील व्यक्तीने पाण्यातल्या व्यक्तीचं लाईफ जॅकेट धरून त्याला वर ओढायचं. पाण्यातील व्यक्तीचा हात धरून त्याला वर ओढलं तर खांदा निखळण्याची शक्यता असते.
या राईडमध्ये एक जागा अशी आहे की जिथे या राफ्ट नदीकिनारी घेतल्या जातात. ती जागा आहे मॅगी पॉईंट. इथे बांबूचा वापर करून उभारलेलं, वर छत म्हणून ताडपत्री टाकलेलं छोटसं हॉटेल आहे. इथे चहा आणि मॅगीसारखे पदार्थ मिळतात. पण काही खाण्यापिण्याअगोदर एक धाडसी गंमत करायची होती - क्लीफ जम्पींग!
इथे नदीकिनारी पाण्यापासून साधारणतः ३० ते ४० फूट उंच खडकाचा भाग आहे. तिथपर्यंत चालत जाऊन खाली वाहत्या पाण्यात उडी मारायची! सर्वजण चालत वर गेले. पट्टीच्या पोहणाऱ्यांनी धपाधप उड्या, सूर, मुटके टाकले. पण ज्यांना पोहता येत नव्हतं त्यांचं काय?
'लाईफ जॅकेटने आम्ही बुडणार नाही पण इतक्या उंचावरून उडी मारून पाण्यात खोल गेल्यावर काय करायचं?' बाबाजीने विचारलं.
'काही होत नाही,' धनाजी म्हणाला. 'पाच-दहा सेकंदात तुम्ही वर याल आणि वर आला की लगेच किनारा गाठायचा...'
उत्साहाच्या भरात बाबाजी खडकाच्या किनाऱ्याकडे धावत आला पण नदीचं खोल पात्र बघून बावरला. इतकं खोल पाणी? नको उडी टाकायला! पण तोपर्यंत शरीराचा झोल पुढे गेला आणि बाबाजी पाण्यात पडला. उडी धोकादायक होती कारण ती पुरेशी दूर पडली नाही. पोहता न येणाऱ्या बाबाजीला पाण्यातून वर येईपर्यंत कितीतरी युगे उलटल्यासारखी वाटली. वर येताच हातपाय मारून त्याने तत्परतेने किनारा गाठला.
मॅगी पॉईंटच्या मागे डोंगरावर एक आश्रम आहे. तिथून एक धबधबा कोसळत खाली येतो. नदीच्या पाण्यात उडी घेण्याची हिंमत न केलेल्या लोकांनी धबधब्याच्या पाण्यात बसून भिजण्याचा आनंद घेतला.
श्रीकांत व कैलासच्या राफ्टमध्ये असलेले गुजराती तरुण 'हम क्लीफ जम्प नही करेंगे' म्हणाले. जीवाला जपून ॲडव्हेंचरस स्पोर्ट्सचा अनुभव घ्यायला आलेले तरुण मागेच थांबले. श्रीकांतने त्यांच्यासमोर क्लीफ जम्प केल्यावर कैलासने 'हम लोग जम्प कर सकते है, तो तुम क्यों नही कर सकते?' म्हणत त्यांच्यात हवा भरली.
'मेरे पीछे आ जाओ, कुछ नही होता,' कैलासने नदीत उडी टाकली. मग त्यातल्या दोघांनी भीतभीत पाण्यात उड्या टाकल्या. पाण्यात खोलवर दाबून धरलेला थर्माकोल सोडून देताच उसळी मारून पाण्यावर यावा तसे ते पाण्याच्या पृष्ठभागावर आले. दरम्यान नाकातोंडात पाणी गेलेला एक तरुण घाबरून मोठ्याने रडू लागला. पण काही वेळाने किनाऱ्याला लागताच तो स्वतःलाच हसला.
'अच्छा हुआ आपने हमे इनकरेज किया. नही तो हम क्लीफ जम्पींग के थ्रिल को मिस करते,' मॅगी खाता खाता त्या गुजराती तरुणांनी कैलास व श्रीकांतचे आभार मानले.
इकडे किरण, निखिल व रजतसारख्यांनी डबल-ट्रिपल उड्या मारल्या. क्लीफ जम्पींग झाल्यावर सर्वजण त्या मेकशिफ्ट हॉटेलात एकत्र आले. थकल्या, भागल्या, भिजल्या जीवांना गरमागरम चहा व मॅगी मिळाली.
आता प्रवासाचा शेवटचा टप्प्या पार पाडण्यासाठी सर्वजण राफ्टमध्ये बसले आणि राफ्ट पुढे निघाली. एकाने माणसं मोजून पाहिली आणि 'गाईडचा सहाय्यक कुठंय?' म्हणून विचारलं.
राफ्टमध्ये गाईडचा सहाय्यकच नाही म्हटल्यावर थोडा गोंधळ झाला पण मागे बघितलं तर तो तरूण वेगाने पोहत राफ्टकडे येत होता.
पुन्हा एकदा सर्वजण आपापल्या जागी स्थिर झाले. इथून लक्ष्मण झुला अवघा ६०० मीटरवर होता आणि यांचा नौकाविहार राम झुल्याजवळ संपणार होता. पण त्यापूर्वी एक शेवटचा रॅपिड यायचा होता.
साह्यकडा एडवेंचर्सच्या राफ्टने शिवपुरी ते ऋषिकेश अंतर वेळेअगोदर पूर्ण केलं. कारण या राफ्टमधील सर्वजण तरुण व उत्साही होते. वर्षाला २०-२० ट्रेक करणाऱ्या तरुणांना विहिरीत, नदीत पोहायचा सराव होता. गावाकडचे हे रांगडे तरुण कुणाच्या मागे कसे राहतील?
इतर राफ्टमधील प्रवासी मात्र थंड पडले होते. काहीजण अक्षरशः कुडकुडत होते. पाण्याचा प्रवाह संथ झाला की त्या राफ्ट स्लो मोशनमध्ये जात असल्यासारखं वाटायचं. साह्यकडा टिमच्या राफ्टकडे बघितलं की बाकी प्रवाशांना आश्चर्य वाटे.
'चिडिमिडी चिडिमिडी धूम धडाका! चिडिमिडी चिडिमिडी धूम धडाका!' 'गंगा मैया की जय!' 'जय शिवाजी! जय भवानी!'
या घोषणांमध्ये बाबाजीने एका नव्या घोषणेची भर घातली. 'बाकी सब ठंडे है!' हमने गाडे झंडे है!'
मग किरण मोठ्या आवाजात 'बाकी सब ठंडे है' ओरडला आणि बाकीच्यांनी 'हमने गाडे झंडे है! म्हणत प्रतिसाद दिला.
'हिप हिप हुर्रे! हिप हिप हुर्रे!'च्या चालीवर टिमने 'बाकी सब ठंडे है, हमने गाडे झंडे है!' घोषणा सलग पाच-सहा वेळा दिली.
'ओके, ओके, रिलॅक्स गाईज!' गाईडने टिमला शांत केलं. मग त्याने 'आर यू रेडी फॉर द फायनल रॅपिड?' विचारताच सगळ्यांनी 'येस्स!' केलं.
काहींनी वेटलिफ्टरसारखं राफ्ट पॅडल दोन्ही हातांनी धरून वर उचलले, काहींनी किंगकाँगसारखी छाती बडवली, काहींनी दंडावरून टी-शर्ट मागे ओढत बायसेप्स दाखवले तर काहींनी आपल्या मिशीला पिळ दिला.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/QZZLDT
Similar Posts
राफ्टींग इन ॠषिकेश 'आर यू रेडी फॉर द राफ्टींग?' गाईडने ओरडून विचारलं. 'येस्सऽऽ' त्यांनीही ओरडूनच उत्तर दिलं. तो: चिडीमिडी, चिडीमिडी, धूमधडाका!
मैत्रीण मीरा आमच्या गावातली होती. आळीतली नसली तरी शाळेतली होती. आम्ही एकाच बसने, एकाच कॉलेजात जायचो. तिच्याविषयी आकर्षण वाटावं असं आजवर तरी काही घडलं नव्हतं. कारण एकाच गावातून, एकाच बसने, एकाच कॉलेजला जाणारे आम्ही दोघेच नव्हतो. माझ्याबरोबर माझे मित्र असत तर तिच्याबरोबर तिच्या मैत्रिणी.
बाळासाहेब हरणतळ्याच्या बाळ्याला जो चांगला म्हणेल, तो वेडा. त्याचे प्रताप जेवढे सांगावेत तेवढे कमी. बाळ्याने घराच्या पडवीत पाऊल टाकताच सदबाने त्याच्या अशी कानाखाली वाजवली की आख्खी पडवी दणाणली. दुस-या गालावर मारण्यासाठी त्याने हात उगारला तर बाळ्याने बापाचा हात वरचेवरच धरला. बाळ्या बापापेक्षा एक फूट उंच आणि शरीराने धिप्पाडही
येडी बाभळ ती बाभळ पांडबाच्या आयुष्यात कधी आली ते त्याला नेमकं सांगता येणार नाही. पांडबाच्या घरापुढची ती बाभळ कधी उगवली ते कुणाला समजलं नाही. पण तिची कुणाला अडचणही नव्हती. बारीक असताना ती वासरं बांधायच्या कामाची होती आणि मोठी झाल्यावर एक-दोन जनावरापुरती सावली देऊ लागली. पांडबाच्या घरापुढं दुसरं कुठलं झाडही नव्हतं

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language